जळगाव, 9 ऑक्टोबर : जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार दि.09 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला.
यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – 100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्यासाठी प्रयत्न करणार –
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, शिक्षण, आरोग्यासह इतर विकासाच्या घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेऊन प्रशासन गतिमान ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवून कशापद्धतीने काम करता येईल, याकडे देखील भर देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठी प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याकडे देखील भर राहणार असल्याचे रोहन घुगे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात झेपी सीईओ म्हणून केलेल्या कामाच्या अनुभव हाती घेत प्रशासकीय सुधारणांकडे देखील लक्ष देण्यात येईल. आयुष प्रसाद यांनी सुरूवातीला शासनाच्या 100 दिवसांच्या तसेच नंतरच्या 150 दिवसांच्या विशेष मोहितेत जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून चांगली कामगिरी करत विकासाचा पायंडा पाडून दिलाय आणि त्यालाच पुढे घेऊन जात जळगावकरांसाठी अगदी लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोहन घुगे म्हणाले.
दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.