मुंबई, 23 मार्च : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी पोलीस प्रशासनात रिक्त असलेल्या जागा आणि पोलीस भरती याबाबत सरकारकडे प्रश्न उपस्थित केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार जाधव यांच्या प्रश्नांना उत्तर देत पोलीस भरती संदर्भात माहिती दिली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
पोलीस फोर्समध्ये आता फक्त साडेदहा हजार जागा रिकाम्या असून साडेआठ ते साडेदहा हजार जागा दरवर्षी रिक्त होत असतात. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की, महाराष्ट्र शासनाच्यावतीने गेल्या तीन वर्षांत 35 हजार 802 पोलिसांची भरती करण्यात आली आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील रेकॉर्ड असून आता पुन्हा नव्याने एकदा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
पोलिसांच्या रिटार्यटमेंटच्या संख्येशी जोडून पुन्हा नव्याने भरती केली जाणार आहे. यामुळे पोलीस भरतीच्या रिक्त जागांसंदर्भात आणि भरती प्रक्रियेत फार मोठे अंतर नसल्याचे गृहमंत्री फडणवीसांनी स्पष्ठ केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीत साधारणतः पाचशे-सहाशे जागांची गॅप असते. मात्र, ते देखील कमी करण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, गतिमान न्यायप्रणाली, अंमली पदार्थ या विषयाशी संबंधित विविध प्रश्नांवर विधानसभेत एकत्रित उत्तर दिले.