छत्रपती संभाजीनगर, 23 फेब्रुवारी : छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात असलेल्या गरुडझेप अकॅडमीत मंगळवारी (20 फेब्रुवारी) रोजी एका तरूणीने गेल्या तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. तरूणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून, अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी?-
छत्रपती संभाजीनगर शहरात वाळूज भागात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारी गरुडझेप अकॅडमी आहे. या अकॅडमीत लीना पाटील (19 वर्ष) या तरूणीने 20 फेब्रुवारी रोजी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीने वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक दिली तसेच ‘तू काळी आहेस,’ असे म्हणत अकॅडमीच्या संचालकाने हिणवले होते. हा अपमान सहन न झाल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तरूणीच्या वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटील हिने दीड वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. यासाठी त्यांनी तीन टप्प्यात एकूण 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. तसेच मेससाठी 4500 रूपये प्रती महिना भरत होते. कधीकधी मेसचे बिल भरण्यासाठी उशीर होत होता.
दरम्यान, पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनावणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचे लीना आपल्या वडीलांना फोन करून सांगायची. तसेच जेवणपण दिले जात नव्हते. मात्र, निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल, असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर देत असायचे, असे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अकॅडमीमध्ये जाऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. लीनाचे मित्रमैत्रिणी आणि इतर विद्यार्थ्यांनीही गरूड झेपच्या संचालकांवर गंभीर आरोप केले. लीनाआधीसुद्धा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाते यांनी दिली आहे. संचालक फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती बगाते यांनी दिली.
हेही वाचा : Crime News : चोपडा तालुक्यातून बोलेरो पिकअपमधून पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा