ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 सप्टेंबर: सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त पाचोरा शहरात शनिवार, १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधींसह सायंकाळी पालखी सोहळा आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण मंदिर, जुनी मानसिंगका बिल्डिंगच्या पाठीमागे, पाचोरा येथे सकाळी ९ वाजता मंगलस्नानाने कार्यक्रमांना सुरुवात होईल. सकाळी ९.३० वाजता विडा अवसर व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय कार्यालयांमध्ये चक्रधर स्वामी जयंती साजरी करून भेटी देण्यात येणार आहेत.
दुपारी १२ वाजता महाआरती होणार असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होणार असून, सायंकाळी ७ वाजता आरतीस्थळी आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून प.पू.प.म. श्रीमंडळीकव्यास बाबा येळमकर, आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा सुनिताताई किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे उपस्थित राहणार आहेत.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पालखी सोहळा समिती, सर्वज्ञ कृपा महिला बचत गट, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था पाचोरा, सर्वज्ञ मल्टीकार मोटर्स पाचोरा तसेच समस्त पुजारी व उपदेशी मंडळी, तालुका पाचोरा यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.






