ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 जुलै: पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ गुरुवारी (३० जुलै) उत्साहात पार पडले. महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाच्या गिरड रोड येथील परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले, तर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या शिबिराला ग्रामीण व शहरी भागातील सुमारे ५ हजार नागरिक व लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी तहसील कार्यालय पाचोरा येथील ११३ आणि तहसील कार्यालय भडगाव येथील ५७ लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
याशिवाय पंचायत समिती पाचोरामार्फत ४ लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या व प्रशस्तीपत्रे, बचत गटांना कर्जवाटप, शिक्षण विभागामार्फत ३ विद्यार्थ्यांना दिव्यांग साहित्य, कृषी विभागामार्फत १२ शेतकऱ्यांना अनुदान व शेती अवजारे, नगरपालिका पाचोरा-भडगावमार्फत ९ लाभार्थ्यांना बँक लिंकेज कर्ज व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, तसेच पशुसंवर्धन विभागाकडून ३ लाभार्थ्यांना नाविन्यपूर्ण शेळीगटांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात महसूल, संजय गांधी योजना, अन्न व नागरी पुरवठा, कृषी, महावितरण, पंचायत समिती, वन विभाग, भूमी अभिलेख, परिवहन, पोलीस, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पशुसंवर्धन, नगरपालिका, राष्ट्रीयीकृत बँका, बीएसएनएल आणि उमेद अभियान अशा विविध विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, मधुकर काटे, संजय पाटील, पदमसिंग पाटील, भडगावच्या नगराध्यक्षा रेखाताई मालचे, पाचोराचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील, नगरसेवक संजय गोहिल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार शीतल सोलाट, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, के. बी. अंजने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकूर आणि विनोद धनगर यांनी केले.






