मुंबई, 24 सप्टेंबर : बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे याचे काल सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत एन्काऊंटर करण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे हे देखील जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी आता सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सखोल चौकशीची मागणी –
आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतरजखमी अवस्थेत त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा अक्षयचे आईवडील रुग्णालयात पोहोचले असता त्यांनी मात्र त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाहीत आणि तो बंदूक कशी खेचू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हा प्रकार घडला असल्याचा आरोप आरोप अक्षयच्या पालकांनी केला. दरम्यान, फोरेन्सिक सायन्सच्या तज्ज्ञांनी आज पोलिसांचे वाहन तपासले असून आता या प्रकरणी सीआयडी तपास करणार आहे. पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी त्या तपासाचे प्रमुख असणार आहेत.
एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग –
बदलपूर बालिका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने तक्रारी दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अक्षयविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून त्याला ताब्यात घेतले होते. पोलीस काल सायंकाळी त्याला तळोजा कार्यालयातून घेऊन जात असताना, त्याने मुंब्रा बाह्यवळणाजवळ पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला.
एकीकडे बदलपूर बालिका अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमून तपास अंतिम टप्प्यात आला असताना आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर करण्यात आल्याने खळबळ उडालीय. आता या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार असून यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू नेमका कसा झाला?, याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, सीआयडीने घटनास्थळाची पाहणी केली असून सीआयडीचे अधीक्षक तपासाचे प्रमुख असणार आहेत.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview