जळगाव, 16 फेब्रुवारी : चोपड्या तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून जळगावात आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी उमर्टी हल्लाप्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील लगतच्या गावांमध्ये अवैध कामे केली जात असल्याची माहिती आपल्या पोलिसांनी मिळाली होती. यामुळे आपल्या पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्याच्या माध्यमातून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी अधिक संख्येने पोलिसांवर हल्ला झाला आणि पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने आपला पोलिसही आपण सोडवलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलीय.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत अवैध कामे त्याठिकाणी होताएत.गावठी कट्टे- शस्त्र तयार झाल्यानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागातही होतोय, याबाबत कारवाई करण्यासंदर्भात मध्यप्रदेश पोलिसांना देखील आपल्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
उमर्टी पोलीस हल्लाप्रकरण –
चोपड्या तालुक्यानजीक महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात गावठी कट्टे बनिवले जातात. असे असताना गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी उमर्टीत पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी चोपडा ग्रामीणच्या शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याला बांधून ठेवत मध्यप्रदेश हद्दीत नेले. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याला सुखरूपपणे परत आणण्यास पोलिसांना यश आलंय. या मारहाणीत सपोनि शेषराव नितनवरे, पोलीस शिपाई किरण पारधी व होमगार्ड विश्वास भिल हे जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रूग्णालायत दाखल करण्यात आले.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत