जळगाव, 27 सप्टेंबर : महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून जळगाव जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे येथे लोकनेते दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व जनसेवा पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांचे जळगावातील विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते धुळ्याकडे रवाना झाले.
दरम्यान, जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आगमन होताच जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तसेच जळगाव जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी याबाबतचे निवदेन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सीईओ मिनल करनवाल तसेच राजकीय पक्षातील स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचा घेतला आढावा –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच आयुष प्रसाद यांनी पावसाची स्थिती, पूर परिस्थिती व पंचनामा कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात फार काही निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपले नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील ते देखील आम्ही मान्य करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनामे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर 2 हजार 300 कोटी रुपये दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, अतिवृष्टीच्या आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धीर देऊन मदत केल्याबद्दल यावेळी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.