कोल्हापुर, 17 फेब्रुवारी : मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय, अशी कबुली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरात शिवसेनेचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावनिक होत वडील म्हणून एकनाथ शिंदे यांची आठवण सांगितली होती. यावरून अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही कबूली दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितलेले नाही. मी जेव्हा घरी जात होतो तेव्हा सगळे झोपलेले असायचे. पिता पुत्रांची भेट महिना-महिना होत नव्हती. काल, श्रीकांतनी माझे डोळे उघडले. कारण मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो आहे.
ते पुढे म्हणाले की, हे तो तुमच्या समोर बोलला. कारण, तो तुम्हाला आपले कुटूंब समजतो. तो बोलला माझ्या बापाचा मला अभिमान आहे. मला पण त्याचा अभिमान आहे. आता तर काय वेळच नाही, कारण संपुर्ण महाराष्ट्र माझे कुटूंब आहे. माझे कुटूंब माझे घर असे माझे नाहीये. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. कोविडमध्ये फिरणारे कोण आणि फेसबूक लाईव्ह करणारे कोण हे सर्वांना माहिती आहे. कोविडमध्ये खिचडी, डेडबॅाडी बॅगमध्ये पैसे खाल्ले आणि कफन चोर, खिचडी चोर बोलायचे. एक-एक करुन सर्व बाहेर येईल. तुम्ही फेसबूकवर खेळायचे हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळतो, घरी बसून उंटावरुन शेळी हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
शिवसेना पक्षातील नेते, पदाधिकारी-कार्यकर्त यांना संबोधित करताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक आपल्याला काहीही करुन जिंकायची आहे. यासाठी गाव तिथे शाखा काढा. गावांच्या वेशीवर शिवसेनेचे फलक लावा आणि प्रत्येक विधान सभेत आपल्याला 50 ठिकाणी आघाडी मिळाली पाहिजे. यावरच आपले भविष्य असल्याचे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या अधिवेशनात शिवसेनेचे नेते, मंत्री, महिला आघाडी, युवासेना सगळे उपस्थित होते.
हेही वाचा : ‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?