मुंबई, 12 ऑक्टोबर : शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडता असताना दुसकरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत ठाकरे गटावर जोरदार प्रहार केलाय. आम्ही हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले की, गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडके सरकार झाले आहे. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडके सरकार झाले आहे. अन्यायाला लाथ मारा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्यामुळेच, त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. दरम्यान, आम्ही हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता, असे शिंदे यावेळी म्हणाले.
ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली जाण्यावरून सातत्याने टीका केली जाते. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केले. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो ते फक्त प्रकल्प आणण्यासाठी. परंतु, मला मुख्यमंत्री करा असे सांगायला जात नाही. दरम्यान, या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती आणि मराठा समाजाला आरक्षण देणार. तसेच आम्ही ताबडतोब आरक्षण दिले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘यांच्या’ अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्ज –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, तुमच्या तोंडाला लागलेले शेण असे लपणार नाही. आम्ही रस्त्यावर फिरत होतो तसेच रुग्णांना मदत करत होतो. परंतु, तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कोणी भेटायला आले त्याला बाहेर काढले आणि हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही, असे सांगितले. मात्र, तुम्ही काय काम केले ते चार चौघात सांगू शकणार नाही. दरम्यान, योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच सांगू. यांच्या अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 17 हजार कोटींचे कर्ज वाढले. ते वाचले असते तर आज मी लाडक्या बहिणींना 3 हजार दिले असते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कॅबीनेट मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
कॅबीनेट मंत्री गुलाबराव पाटील दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले की, या राज्यात 20 वर्षांपासून मी आमदार आहे. मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले आहेत. एक वर्षात तब्बल 14 वेळेस मुख्यमंत्री कोणी जिल्ह्यात आणायचे काम केले असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, कावळा कितीही उंचीवर गेला तरी तो कबूतर बनत नाही, हे मी संजय राऊतला सांगतोय. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे तर वेळ सांगेन, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.