ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 सप्टेंबर : आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. जी-20 परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जोरदार समाचार घेतला.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? –
उद्धव ठाकरे यांनी जळगावातील सभेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यातील कार्यक्रमात जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, हा कुठला पब्लिसिटीचा किंवा प्रदर्शनाचा कार्यक्रम नाही. तुम्ही घरी बसले आहेत, आम्ही लोकांच्या दारी जात आहोत. लोकांना मदत करतोय, तुम्हाला संधी होती तरी तुम्ही लोकांना मदत केली नाही, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर तुम्ही कितीही आरोप केला तरी हा कार्यक्रम बंद होणार नाही. हा कार्यक्रम राज्यभर असाच सुरू राहणार आणि लोकांना योजनांचा लाभ देता राहणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात बोलताना सांगितले.
प्रलंबित कामांना गती –
शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली. पाचोरा येथील एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती –
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.जयकुमार रावल, आमदार किशोर पाटील,आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटिल , आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती –
‘शासन आपल्या दारी‘ अभियानात पाचोरा – भडगाव तालुक्यातील 50 हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री शिदे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात आतापर्यंतच्या 14 कार्यक्रमातून 1 कोटी 61 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून शासन गतिमान झाले आहे.
शेतकऱ्यांनी दिली मदत –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना राबविल्या आहेत. शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले. महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास , शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेत वर्षाला १२ हजार रूपयांची मदत दिली जात आहे. एक रूपयात पीक विमा क्रांतीकारी योजना आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे.
सरकार शेतकऱ्यांशी पाठीशी –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती पूर्व सूचना देणारे सॅटेलाईट शासन उभारणार आहे. यावर्षी पाऊस कमी पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी-20 परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने 35 जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे 8 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लाभार्थ्यांना व्यासपीठावर संधी –
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये शामकांत शामकांत गणपत जोशी (सातडोंगरी, ता. पाचोरा), गणेश गजानन खोदरे (पाचोरा) , रेखा संदीप मोरे,(टोणगाव, ता. भडगाव) सचिन कैलास पाटील,(पाचोरा) साबेरा बी अहमद (भडगाव), दुर्वास जगन्नाथ पाटील (अंजनविहिरी, ता.भडगाव) समर्पित महेश वाघ (गोराडखेडा, ता. पाचोरा), आकाश हिम्मत भिल्ल, (तारखेडा, ता. पाचोरा), भागवत सखाराम बोरसे (आसनखेडा, ता. पाचोरा), पल्लवी मनोहर पाटील (गुढे, ता.भडगाव), प्रविण गंगाराम राठोड (गाळण,ता.पाचोरा) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती –
यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले.
लाभार्थ्यांना वाटप-
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.
शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल –
शासन आपल्या दारी अभियानाच्या पाचोऱ्यातील कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 25 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.