चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 28 जून : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस पार पडला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची’ अजित पवारांनी घोषणा केली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर जोरदार टीका –
लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. लाडका भाऊ योजना का नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली आहे. 10 हजार रुपये आम्ही देत आहोत, पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय? असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.
महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प –
राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. 1 लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –
अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही. सरकारने लाडकी बहीण योजना आणली. आम्हाला त्याचा आनंद आहे. महिलांसाठी योजना आणल्यानंतरही आजसुद्धा लोंढेच्या लोंढे नोकरीच्या शोधत फिरत असून लेकींची काळजी घेत आहेत, लेकांची काळजी यात नाही, त्यामुळे लाडका पुत्र योजना त्यांनी आणावी, असे त्यांनी म्हटले होते.
थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प –
उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले की, जनतेने लोकसभेला जो दणका दिला. त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवले आहे, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. काहीतरी धुळफेक करायची आणि जनतेला लुबाडायचे काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प होय. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचे झाले तर खोटे नेरेटिव्ह पसरव्याचे काम या बजेटमधून केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टोला लगावला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा –
राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
हेही वाचा : Breaking : लेक लाडकी योजनेची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा, काय संपुर्ण बातमी