चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नाशिक, 22 जून : जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. दरम्यान, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. यानंतर शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, काल बैठक झाली होती. कालच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही सर्वजण उपस्थित होते आणि समाजा-समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी चर्चा करण्यात आली होती. मराठा आणि ओबीसी समाजात वाद होवू नये यासाठी चर्चा झाली. दरम्यान, अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतले असून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री शिंदे दिली आहे.
कोण आहेत लक्ष्मण हाके? –
लक्ष्मण हाके सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. हाके यांनी 2003 साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली.
तसेच शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केले. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक असल्याची माहिती आहे. जानेवारी 2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा : कोकण, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस, जळगाव जिल्ह्याचा नेमका काय आहे अंदाज?