मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाऊंटर नंतर विरोधकांनी पोलिसांच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांच्या या टिकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आता विरोधक म्हणाले की, बदलापूरमधील आरोपीला फाशी द्या, आमच्या समोर आणा, आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो, तेव्हा पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील? आणि ते केलं नसतं, तर म्हणाले असते, अरे वाह 4 लोकं असून आरोपी गोळीबार करुन पळून गेला, पिस्तूल, बंदूक काय शोपीस म्हणून ठेवली आहे, असा सवाल विरोधकांनी केला असता, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल –
अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या या प्रकरणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतु, या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणे अपेक्षित असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचं पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आलंय. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. यामध्ये स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर दुसरीकडे या एन्काऊंटरवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे गंभीरित्या जखमी झाले. सध्यास्थितीत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप केले जात आहेत. यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview