जळगाव, 28 सप्टेंबर: आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळ, अपमान, शिवीगाळ व मानसिक त्रासाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू गंभीर बाब असून, या प्रकरणातील सर्व बाबी निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
साहिलच्या कुटुंबीयांनी त्याला जातीय अपमान, शिवीगाळ आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच साहिलने पहिल्या सेमिस्टरमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर तपास पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षेत कॉपी केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे कथन करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
त्यानंतर आयआयटी मुंबई प्रशासनाने तपास पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारे निष्कर्ष मांडणे अयोग्य असल्याचे मान्य करून माफी मागितल्याचे आणि संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, केवळ माफी किंवा निलंबनाने हा विषय संपत नसून साहिलच्या मृत्यूमागील प्रत्येक बाबीची सत्यता निष्पक्ष चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याचे ॲड. कटारे यांनी म्हटले आहे.
तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करण्याची मागणी –
उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही या घटनेमुळे प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जातीय भेदभाव, अपमान किंवा मानसिक छळामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाच्या परिसरात असुरक्षित वाटू नये, यासाठी आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्वतंत्र, पारदर्शक आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई, तपास पूर्ण होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यावर दोषारोप करणाऱ्या वक्तव्यांची जबाबदारी निश्चित करणे, तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत व आवश्यक न्यायिक सहकार्य देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रवीण सुरवाडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, आनंद विठ्ठल बागुल, ॲड. मयूर निकम, सिद्धार्थ दौलत बागुल, ॲड. प्रदीप सूर्यवंशी, एकनाथ लखा सोनवणे, जगदीश गाडे, प्रदीप सोनवणे, राजू भोसले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा: VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील






