पाचोरा, 8 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लोहारी याठिकाणी अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनाच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. मात्र, पाचोरा येथे आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. तसेच यावेळी मुख्यमंत्री यांनीही त्यांचे ऐकून घेतले.
ताफा का अडवला –
मराठा समाजाबद्दल अपशब्द वापराणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करावे आणि तत्काळ अटक करावी. तसेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहे. तरी राज्य सरकार मराठा आरक्षणावर मौन आहे. हे मौन तोडुन त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच राजे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षकच होते, या मागण्यांसंदर्भातील निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडवण्यात आला.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर; वाचा, नेमकं काय आहे कारण?
ताफा अडवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष जिभाऊ पाटील, पी. डी. भोसले, बाळु पाटील, संजय मुळे, मनोज पाटील, हेमंत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.