मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 17 मार्च : चोपडा शहरातील रहिवासी आणि मणिपुरमध्ये सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असलेल्या चेतन पांडुरंग चौधरी या जवानाचा मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात शनिवार 15 मार्च रोजी निधन झाले. दरम्यान, खान्देश सुपत्र शहीद जवान चेतन पांडुरंग चौधरी यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदायाच्या उपस्थितीत शहीद जवानास अंतिम निरोप देण्यात आला.
शहीद जवान चेतन पांडुरंग चौधरी यांचे पार्थिव आज मणिपूरमधून चोपड्यात दाखल झाले. यावेळी शहीद जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. चोपड्यात शहरभर तिरंगा रॅली काढून नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीद जवान चेतन चौधरी अमर रहे..अमर रहे..वंदे मातरम! अशा घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, बीएसएफ जवानांसह जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या चिरंजीवाने अग्निडाग देत शहीद जवानास अंतिम निरोप दिला. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तहसिलदार, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच प्रशासनातील अधिकारी, हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
आमदार चंद्रकांत सोनवणेंनी व्यक्त केली शोक संवेदना –
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे शहीद जवान चेतन चौधरी यांच्याप्रती शोक संवदेना व्यक्त केली. ते म्हणाले की, मणिपूर येथे झालेल्या अपघातात शहीद जवान चेतन चौधरी हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. मात्र, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि जवान चेतन चौधरी हे शहीद झाले.

त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघातातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. आणि शहीद जवान चेतन चौधरी यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे तसेच माजी आमदार लता सोनवणे यांच्यावतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती!
मणिपुरमध्ये अपघातात झालं होतं निधन –
मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात 37 बीएन बीएसफची तुकडी कार्यरत होती. दरम्यान, ड्युटीवरून परत येत असताना 11 मार्च रोजी इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग या गावात ट्रक दरीत कोसळल्याने 2 जवानांचा जागीच तर एका जवानाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता. यासोबतच इतर 13 जखमी जवानांवर इम्फाळमधील रूग्णालयात उपचार सुरू होते.
तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चैतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या 12 वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी तसेच आई-वडील, एक भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.
हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर