ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 जून : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना 5 जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अवघ्या 48 तासांत पोलिसांनी वेगाने तपास करत खूनाचा उलगडा केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. साहील मुकद्दर तडवी (वय 21), राकेश बडीराम हातागडे (वय 21 वर्ष) आणि राजेश अनिल हातागडे (वय 18) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय प्रकरण? –
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना 5 जून रोजी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जनाबाई महारू पाटील (वय 85 रा. शेवाळे) असे मयत महिलेचे नाव होते. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा कृष्णाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. जनाबाई पाटील यांच्या गळ्यात 10 ग्रॅम सोन्याची पोत तसेच इतर दागिने होते आणि हे दागिने चोरण्याचा हेतूने अज्ञात आरोपीने खून केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
वृद्ध महिलेच्या खूनाचा पोलिसांनी केला उलगडा –
स्थानिक गुन्हे शाखेसह पिंपळगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खूनाचा उलगडा केला आणि तीन आरोपींना अटक केली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे जनाबाई पाटील यांच्या ओट्यावर नेहमी बसायचे आणि तिथे टिंगल टवाळी करायचे. म्हणून जनाबाई पाटील यांनी त्या तिघांना खडसवाले होते. याचाच राग मनात ठेऊन आरोपींनी खूनाचा कट रचला आणि 5 जून रोजी रात्री जनाबाई पाटील यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने आत प्रवेश करून त्यांची टणक हत्याराने मारहाण करत खून केला. तसेच त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेऊन अंधाराचा फायदा घेत ते घटनास्थळावरून पसार झाले.
एलसीबीसह पिंपळगाव पोलीस स्टेशनची विशेष कामगिरी –
वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती काढून समांतर तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरूळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआ संदीप पाटील,पीएसआय शेखर डोमाळे, शरद बागल तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रकाश काळे, पीएसआय विठ्ठल पवार, पीएसआय प्रकाश पाटील, सहाफौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, भूषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, नरेंद्र नरवाडे अभिजित निकम, अमोल पाटील, इमराण पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, सागर पाटील आदींनी विशेष कामगिरी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत.
हेही वाचा : हवामानात बदल का होतोय? | जागतिक पर्यावरण दिन | पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांची विशेष मुलाखत