चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज 17 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दुपारी नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी 29 शहीद जवानांच्या स्मारकासाठी DPC मधून 4 कोटी 35 लक्ष निधी खर्च प्रस्ताव विशेष मान्यता देण्याबाबत मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –
नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील 11 आमदार तसेच 2 खासदार यांच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी शहीद जवानांच्या स्मारकासाठी डीपीसीमधील निधी खर्चाबाबत भूमिका मांडली. जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकासाठी डीपीसीमधून साडेचार कोटी रूपये खर्च करण्याबाबत त्यांनी मागणी केली.
…अन् गुलाबराव पाटलांची उपमुख्यमंत्र्यांनी मागणी केली मान्य –
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या मागणीच्या विचार केला असता, डीपीसी खर्चाबाबतचे आमचे जे नियम आहेत त्यामध्ये ते बसत नाही. पण राज्याच्या नियोजन विभागाला तसेच त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो. त्यामुळे राज्याचा नियोजन मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची मागणी मान्य करून उद्याच एसीएस देवरा यांना याबाबतचे आदेश देतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांचे शहीद जवानांना अभिवादन –
देशाचे तसेच आपल्या सर्वांचे रक्षण करत असताना जे जवान शहीद झालेले आहेत, अशा जवानांचे स्मारक झाले पाहिजे. क्वचितच अशा गावात शहीद जवान असतात आणि त्या गावाला वाटतं की शहीद जवानाचे स्मारक झाले पाहिजे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांची मागणी मान्य करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यावेळी अजित पवार यांनी शहीद जवान यांना अभिवादन केले.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत जळगाव जिल्हा सिंचन धोरण, खरीप हंगामाची तयारी, तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना, शेततळे योजना, विभागीय क्रीडा संकुल उभारणी, गंगाखेड बेट पर्यटनासह विभागातील पर्यटन विकास, जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व रेल्वे एकत्रीकरण, MIDC औद्योगिक विकास, बँकिंग पतपेढी आराखडा यांसह जिल्ह्यातील प्रलंबित व सुरु असलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
यांची होती उपस्थिती –
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खा स्मिता वाघ, आ. अनिल भाईदास पाटील, आ.सुरेश ( राजू मामा) भोळे, आ. किशोरआप्पा पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल पाटील, आ. अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.