मुंबई, 8 जुलै : महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून राज्याच्या काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या पावसाबाबत ट्विट करत चिंता व्यक्त केलीय.
अजित पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? –
अजित पवार यांच्या ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे.
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलंय.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा –
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईत तुंबलेल्या पावसावरून राज्य सरकारवर टीकी केलीय. त्यांनी म्हटलंय की, मुंबईत पाऊस येणे हे अचानक झालेले नाही. यातून पावसाळ्यापूर्वी काम झालेले नाही हे सिद्ध होत आहे. मात्र, आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे.
हेही वाचा : Rain Update : राज्यभरात मुसळधार पाऊस, ‘असा’ राहील जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज