चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 8 जून : लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जोपर्यंत पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही, असे सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? –
लोकसभेत आपल्याला मिळालेली मते कायम ठेऊन त्यामध्ये दीड टक्के मतांची भर घातली तरी आपण विधानसभा जिंकू तसेच महायुती म्हणून आपण सर्व एकत्र येऊन पुन्हा एकदा मैदान फतेह करू, असा विश्वास विश्वास त्यांनी आमदारांनी दिला. ज्यादिवशी लोकसभेची निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी कामाला लागलोय. जोपर्यंत पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्ही थांबू नका, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस अॅक्टीव्ह मोडमध्ये –
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित असे यश न मिळाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबादारी आपण स्वीकारत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर फडणवीसांनी आता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, आज भाजप आमदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात.
हेही वाचा : Modi 3.0 : महाराष्ट्रातील कोणते खासदार बनणार केंद्रात मंत्री? खान्देशातून कुणाला मिळणार संधी? संभाव्य यादी