यवतमाळ, 3 एप्रिल : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केलं. त्यानंतर मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर मतदान पार पडले. यानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर विरोधात 232 मते पडली आहेत. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी वक्फ विधेयकाविरोधात मतदान केलं. यावरून ठाकरे गट-शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
यवतमाळ येथे आज शिंदेंच्या शिवसेनेच्या आभार सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 2019 साली स्वतःच्या स्वार्थासाठी-खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तसेच हिंदुत्व सोडून त्यांनी गद्दारी केली. मात्र, त्याहूनही दुप्पट गद्दारी त्यांनी कालच्या दिवशी वक्फ विधेयकाविरोधात निर्णय घेऊन केली. म्हणून बाळासाहेब समाजाला नेहमी सांगायचे जो देशभक्त आहे, तो माझा. मग तो हिंदु असे मुस्लिम. मात्र, जो देशाचा दुश्मन आहे, तो माझा दुश्मन.
दरम्यान, जे लोकं आज बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत त्यांचे विचार पायाखाली तुडवताएत, त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांना कलंक लावण्याचे काम केले. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
जनता हाच माझा ऑक्सिजन –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील लाडकी बहिण, शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य कष्टकरी जनता हाच माझा ऑक्सिजन आहे. म्हणून हा एकनाथ शिंदे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहील. पदे येतात अन् पदे जातात. सत्ता येते जाते अन् पुन्हा येते. पण एकदा नाव गेले की नाव पुन्हा येत नाही. पण मला आनंद आहे की, महाराष्ट्रातील अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, हा सर्वात मोठा मान आहे. दरम्यान, कुठला पुरस्कार मिळावा, म्हणून मी काम करत नसल्याचेही शिंदे म्हणाले.