मुंबई, 3 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेची चर्चा कायम आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात मिळणार, असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं? –
‘लाडकी बहीण’ योजनेच्या डिसेंबर महिन्यांच्या पैशांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यात देऊन टाकले. मी आता आपल्याला सांगतो की, 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर, याच नोव्हेंबरमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार आहोत. कारण आमचा हेतू स्पष्ट असून आम्ही देणारे लोक आहोत घेणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणी यांना माफ करणार नाहीत. या अडथळे निर्माण करणाऱ्यांना त्या नक्कीच जोडे दाखवतील आणि या सावत्र भावांपासून त्या निश्चितपणे सजग आहेत. एवढेच नाही तर आम्ही केवळ 1500 रुपयांवर थांबणार नाही, आशिर्वाद मिळाला तर आम्ही ते आणखी वाढवू. दरम्यान, माझ्या बहिणींना लखपती बनवण्याचे आमचे स्वप्न असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.