चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा/पुणे, 11 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा राज्यात होत आहे. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातच आज पिंपरी चिंचवड येथील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४ उमेदवार उभे आहेत. यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून जयश्री सुनिल सोनवणे, ओबीसी पुरुष प्रवर्गातून शुभम दिलीप वाल्हेकर, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निशा प्रितम चिंचवडे आणि यांच्यासह सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून खान्देशातील ज्ञानेश्वर माऊली जगताप हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यामध्ये ज्ञानेश्वर माऊली जगताप हे मूळ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जळु येथील आहेत. मागील ५-६ पिढ्यांपासून त्यांचे पणजोबा, आजोबा (मूळ रहिवासी – तरवाडे, ता. जि. धुळे) हल्ली मुक्काम मागील १५-२० वर्षांपासून ते बिजलीनगर येथे वास्तव्यास आहेत. यासोबतच ज्ञानेश्वर माऊली जगताप यांनी गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कानुबाईच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश भाऊ महाजन, माजी खासदार ए. टी. नाना, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासह खान्देशातील अनेक उपस्थित होते. जवळपास १५ हजार लोक माऊली आबा जगताप यांच्या कानबाई महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आमदार किशोर आप्पांचीच सभा का? –
सध्या या प्रभागात आता ज्ञानेश्वर माऊली जगताप यांच्यासह शिवसेनेचे ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागात जवळपास एकूण ५७ हजार मतदारांपैकी २५ के ३० हजार खान्देशी मतदार आहेत. त्यामुळे खान्देशातील मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा निवडून येत आपल्या मतदारसंघात एक इतिहास रचला. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या पाचोरा आणि भडगाव या दोन नगरपरिषदेत स्वबळावर निवडणुक लढवत दोन्ही नगरपालिकांवर भगवा फडकवत शिवसेनेची एकहाती सत्ता मिळवली. आपल्या मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांच्या बळावर त्यांनी जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे आता त्यांचे पक्षात वजन वाढले असून आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी, खान्देशी मतदारांना तसेच तेथील स्थानिक मतदारांना साद घालण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील हे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






