जळगाव, 6 ऑगस्ट : महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांकरिता अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडल कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. शिबिरानंतर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या 4 अवलंबितांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. जळगाव मंडल कार्यालयातर्फे आयोजित शिबिरास जळगाव परिमंडलाचे सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे, जळगाव मंडलाच्या व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व अवलंबितांस महावितरणची अनुकंपा तत्त्वाबाबतची माहितीपुस्तिका देण्यात आली. शिबिरास उपस्थित सर्व विभागीय कार्यालयांच्या उपव्यवस्थापक (मानव संसाधन) यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जळगाव मंडलात 17, धुळे मंडलात 15 व नंदुरबार मंडलात 3 अशा परिमंडलांतर्गत एकूण 35 अवलंबितांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरानंतर 1 कनिष्ठ सहायक (मानव संसाधन), 2 विद्युत सहायक, 1 कनिष्ठ कार्यालयीन सहायक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी परिमंडलातील मानव संसाधन विभागाच्या सर्व व्यवस्थापक व उपव्यवस्थापकांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : उत्तराखंड ढगफुटी: जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची तत्परता