चोपडा, 23 जुलै: चोपडा तालुक्यातील ‘वामन ॲक्युपंक्चर अँड नॅचरोपॅथी सेंटर’चे संचालक डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार 19 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य व दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) आणि AGMA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात ॲक्युपंक्चर व निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपचारकांचा सन्मान करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कार्यरत असलेल्या डॉ. सैंदाणे यांनी हजारो रुग्णांवर उपचार करून आरोग्य सेवा क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही आयुर्वेद, योग, सिद्ध, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचार अशा विविध चिकित्सा पद्धतींच्या संवर्धनासाठी कार्य करणारी देशातील अग्रगण्य नोंदणीकृत संस्था आहे. या सोहळ्यास मराठी अभिनेते डॉ. सुयोग गोरेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझिर काझी, तसेच ॲड. दत्तात्रय जाधवर आणि ॲड. नागेश सोनुने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच डॉ. अभिजित कवठकर, डॉ. प्रशांत सावंत, डॉ. दिशा चव्हाण, डॉ. स्मिता खारकर, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सारंग फुके, डॉ. श्रीधर मेश्राम, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. तुषार वाघुळे, डॉ. विजय पाटील यांच्यासह AIMA व AGMA चे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर






