नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही, असे प्रतिपादन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी केले. तसेच हित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झाले. यावेळी संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते.
महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे.
मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्ता हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : “त्यांनी तसंच करून दाखवलं! म्हणून, एकनाथ शिंदेंना…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना इशारा