मुंबई, 24 जानेवारी : प्रदेश काँग्रेसने निलंबित केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील, पत्नी वर्षा पाटील यांच्यासह भाजपत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रावेर तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो समर्थकांनी देखील भाजपत प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या गळ्यात भाजपचे मफलर घालत त्यांचे भाजपत स्वागत केले.
काय आहे संपूर्ण बातमी? –
काँग्रेस पक्षाने तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी देवेंद्र मराठे यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. दरम्यान, यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी तत्काळ पत्रकार परिषद काँग्रेसच्या निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत पुढील दोन दिवसांत भूमिका जाहीर करेन, असे सांगितले. दरम्यान, या दिवसांच्या आतच डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांसह भाजपत प्रवेश केला आहे.
केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती –
मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ. उल्हास पाटील हे पत्नी व कन्येसह भाजपत दाखल झालेत. दरम्यान, डॉ. केतकी पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसे युवक अध्यक्ष देवेंद्र मराठे, शैलेश राणे, संदेश पाटील, पुंजाजी पाटील व पाटील यांचे शेकडो समर्थकांनीही भाजपात प्रवेश केला.
मुंबईत पार पडलेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यास मंत्री गिरीश महाजन, आशिष देशमुख, माजी आमदार जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, रोहित निकम, नंदकुमार महाजन, सुभाष पाटील आदी भाजपचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता