जामनेर, 22 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा काल जामनेरात आली. या यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे तसेच पक्षातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जामनेरात भव्य सभा पार पडली. दरम्यान, या सभेत मोठ्या प्रतिक्षेनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थिती लावली. यावेळी खडसे यांनी जोरदार भाषण करत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले एकनाथराव खडसे? –
जामनेरातील शिवस्वराज्य यात्रेसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, जामनेर हा मतदारसंघ भाजपला दिला आणि भुसावळ मतदारसंघ हा शिवसेला दिला. म्हणून गिरीश महाजनांचा याठिकाणी नंबर लागला. पण आता असं वाटतंय की मी हे पाप केलं. ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला. मला ज्यावेळी 35 वर्षांपूर्वी पक्षाने तिकीट दिलं. त्यावेळी असं वाटलं की हा माणूस एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा संस्कारातला असेल. पण अलीकडे जर आपण बघितलं की, त्यांचं काय बोलणं, काय चालणं आहे, असा मिश्किल टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लगावला.
लिहा तांड्या सारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई होती. त्यावेळी टँकर लागले होते. आजच्या स्थितीत जर पाहिलं की, जवळपास 16 एमआय टँक बांधून पुर्ण केले आहेत. यावेळी खडसे यांनी गावांची यादी वाचून दाखवत जामनेर मतदारसंघ हा जर सुजलाम सुफलाम आहे तर याचे मूळ श्रेय फक्त नाथाभाऊंचे आहे, असे खडसेंनी सांगितले.
…अन् नाथाभाऊंनी सांगितला 2009 चा किस्सा –
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, 1995 साली जी परस्थिती निर्माण झाली होती. अगदी आजही तिच परिस्थिती आहे. ही निवडणूक आरपारची असून ज्यांना सत्तेत बसवलं त्यांना खाली खेचण्याचे काम आम्ही करणार आहोत. ज्यावेळी 2009 साली सोनिया गांधीची याठिकाणी सभा झाली होती. या सभेनंतर गिरीश भाऊ माझ्याकडे आले होते. त्यावेळी ते माझ्या हाता-पाया पडू लागले आणि म्हणाले की, बोदवडा होणारी शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेरात करा. आणि मग मी बोदवडची सभा रद्द करून खास गिरीश भाऊंसाठी शत्रुघ्न सिन्हा यांची सभा घेतली. यानंतर राजकीय वातावरण बदलले आणि गिरीश महाजन 5 हजार मतदाधिक्याने निवडून आले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत