जळगाव, 7 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवरून अनेकदा राजकारण तापल्याचे पाहायला मिळते. अशातच काल एकनाथ खडसेंनी एका पत्रकाराचा संदर्भ देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. यावर मंत्री महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया देत खडसेंकडे पुरावे मागितले. दरम्यान, आता पुन्हा एकदा यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांना सवाल –
एकनाथ खडसे म्हणाले की, एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही. हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे. अमित शहा यांच्याकडे याबाबतचा सीडीआर उपलब्ध आहे, असे थत्तेंनी सांगितले. यामुळे गिरीश महाजनांनी माझं नाव घेऊन आदळ आपट करण्याची गरज नाही. त्यांना पुरावे मागयचे असतील तर त्यांनी अनिल थत्ते यांच्याकडे मागावेत. नाथाभाऊंकडे कशाला पुरावे मागत राहतातएत.
दरम्यान, अनिल थत्ते यांच्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे की नाही हे तुम्ही शोधा. अन्यथा त्यांच्यावर काही कारवाई करायची असेल तर करा, असेही मंत्री गिरीश महाजन यांना खडसे म्हणाले आहेत. दरम्यान, गिरीश महाजन यांचे आयएएस अधिकाऱ्यासोबत काही बोलण झालंय, यासंदर्भात नाथाभाऊंनी कधीही आरोप केलेले नाहीत. अनिल थत्ते यांच्या चॅनलचा हवाला देऊन मी बोललो होतो, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
View this post on Instagram
मंत्री महाजन यांनी दिलं होतं पुरावा देण्याचं आव्हान –
एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या गौप्यस्फोटाचा संदर्भ देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गेल्या सात टर्मपासून आमदार आहे. आता मंत्री आहे. हे बघून त्यांची इतकी जळफळाट होतेय की ते वाटेल ते वक्तव्य करताएत. दरम्यान, त्यांनी माझ्याविरोधात एक तरी पुरावा द्यावा. माझा अंत बघू नका, मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर त्यांना ऑईलपेंट लाऊन तोंड काळं करूनच बाहेर निघावं लागेल, असे आव्हानच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले होते.