वाशिम : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळते की भाजपच्या नेत्याला संधी मिळते, यावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी एक विधान केले. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले. त्यांच्या विधानानंतर आता त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.
धैर्यशील माने यांचं विधान काय –
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने म्हणाले की, साहेब रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री असल्याचं शासन म्हणत असेल. पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा एकनाथ संभाजी शिंदे हेच आहेत. आपण प्रकाशराव आबिटकर यांच्या रुपाने कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रीपद तर दिलेच पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळाले आणि पालकमंत्रीपद पण मिळाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रत्युत्तर दिले –
खासदार धैर्यशील माने यांच्या या विधानावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ‘ठीक आहे. असतील ना. पण आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. त्यांचे नेते आहेत. त्याच्या मनात ते मुख्यमंत्री असू शकतात. त्यात वाईट काय,’ अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलताना दिली.