जळगाव, 21 नोव्हेंबर : जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार, जळगाव शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष स्थापित कक्षात 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिली आहे.