जम्मू : योग्य बातमी ओळखण्यासाठी वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा तपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या सहयोगी प्राध्यापक अर्चना कुमारी यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), जम्मू येथे सोमवारी “फॅक्ट चेकिंग” या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचा उद्देश आजच्या जटिल मीडिया लँडस्केपमध्ये चुकीची माहिती ओळखण्यासाठी, पडताळण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गंभीर कौशल्यांसह विद्यार्थी आणि मीडिया व्यावसायिकांना सुसज्ज करणे हा होता. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अर्चना कुमारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संरक्षक म्हणून संस्थेचे प्रादेशिक संचालक डॉ. दिलीप कुमार यांनी काम पाहिले. तर डॉ. रविया गुप्ता संयोजक, शैक्षणिक आणि शिक्षक सहकारी राजीव कुमार आणि गुलशन कुमार उपसंयोजक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दिलीप कुमार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी त्यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले. यानंतर डॉ. रविया गुप्ता यांनी प्रमुख पाहुण्या डॉ.अर्चना कुमारी यांचा औपचारिक परिचय करून दिला.
काय म्हणाल्या डॉ. अर्चना कुमारी –
या कार्यशाळेत डॉ. अर्चना यांनी प्रसारमाध्यमांमधील दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्या पसरवण्याच्या समस्येवर सखोल चर्चा केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात तथ्य तपासणी का आवश्यक आहे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा समाजावर कसा विपरीत परिणाम होतो यावर त्यांनी भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना तथ्य तपासण्याच्या विविध पद्धती अनेक उदाहरणांद्वारे समजावून सांगितल्या आणि खऱ्या बातम्या ओळखण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रांवर चर्चा केली. त्यासाठी विविध स्रोतांकडून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चुकीची माहिती, स्थानिक बातम्यांचा दर्जा, सर्वसमावेशक पत्रकारिता आणि तांत्रिक बदल यासारख्या माध्यमांसमोरील अनेक प्रमुख आव्हानांवरही त्यांनी चर्चा केली. यासोबतच सोशल मीडियाचे लोकशाही स्वरूप आणि त्यातील कमतरतांकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच प्रादेशिक भाषांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यावर भर देणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी काही उपायही सुचवले.
फेक बातम्यांच्या घातक परिणामांवर बोलताना डॉ. अर्चना म्हणाल्या की, WhatsApp वर फॉरवर्ड केलेल्या चुकीच्या माहितीमुळे समाजात लहान मुलांची तस्करी आणि मॉब लिंचिंग यासारख्या भयानक घटना घडू शकतात. या कार्यशाळेत त्यांनी मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन आणि मालइन्फॉर्मेशन यातील फरक आणि त्यांचे धोके यावरही चर्चा केली. चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर कसा परिणाम होतो, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावर उपाय म्हणून सामग्रीचा मूळ स्त्रोत ओळखण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज, रेव्ह आय, येंडेक्स, टीन आय आणि केड्रल यासह विविध तांत्रिक साधने सुचवली.
त्यांनी क्रेप चाचणीच्या संकल्पनेवरही प्रकाश टाकला. यामध्ये C म्हणजे संदर्भ (कंटेक्स्ट), R म्हणजे प्रासंगिकता (रिलेवन्स), A म्हणजे अधिकार (अथॉरिटी), A म्हणजे अचूकता (एक्सूरसी) आणि P म्हणजे उद्देश (पर्पज) असा त्याचा अर्थ होतो. कोणत्याही सामग्रीवर याचा वापर करून, त्याची सत्यता तपासली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. अर्चना कुमारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले. यावेळी डॉ. दिलीप कुमार यांनी डॉ. अर्चना कुमारी यांना राजभाषा किताब देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाचे संचालन अनामिका पांडे व स्तुती यांनी केले. तर शैक्षणिक आणि शिक्षक सहकारी गुलशन कुमार यांनी सादर केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यशाळेचा समारोप झाला.