मुंबई, 14 ऑक्टोबर : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दुर्दैवाने आज 14 ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन –
मागील अनेक दिवसांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचे अनेकांनी भरभरुन कौतुक देखील केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासही सज्ज देखील झाले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली –
जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर एक दमदार प्रवेश करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाची निवडही केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतलाय. एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना यावेळी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Breaking : दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय