पाचोरा, 30 जुलै: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) अंतर्गत पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अति घन कापूस लागवड, पीक संरक्षण आणि खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यापूर्वी अभियानाअंतर्गत ‘श्रीराम शेतकरी दूध उत्पादक गट’ तसेच ‘एकता शेतकरी गट (पाणी फाउंडेशन)’ यांनी निवडलेल्या शेतकऱ्यांना क्लोजर स्पेसिंग व सघन कापूस लागवडीसाठी कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले होते. हे बियाणे तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड व मंडळ कृषी अधिकारी यू. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आले.

यानंतर तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली लासगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा गटाचे अध्यक्ष मधुकर सीताराम पैठणकर हे होते.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी यू. आर. जाधव आणि कृषी शास्त्रज्ञ किशोर सिनकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अति घन कापूस लागवडीचे तंत्र, पीक संरक्षण, संतुलित खत व्यवस्थापन तसेच कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी कमी अंतरावर कापसाची सघन लागवड करून उत्पादकता वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला आत्मा गटाचे सदस्य, कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी सुनील साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी प्रतीक्षा पवार, अभिजित पाटील आणि रोहिणी पाटील यांनी सहकार्य केले.
हेही वाचा: Rain Update: जळगाव जिल्ह्याला आज रेड अलर्ट; सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात






