जळगाव, 30 जुलै : जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज (30 जुलै) रेड अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून पावसाचे विविध अंदाज वर्तवले जात होते. मात्र, अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नव्हता. आता मात्र हवामानात मोठा बदल झाला असून, जळगाव जिल्ह्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय असून त्याचा प्रभाव मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर पडत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सकाळपासून जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली असून, दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना –
- हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
- अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे अनावश्यक प्रवास टाळा.
- नदी, नाले आणि धरण परिसरात जाणे टाळा.
- वीजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
- आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधा.
हेही वाचा: SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO






