छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. जात-धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या बापाने मुलीच्या चुलत भावासह जावयाची भर रस्त्यात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमित मुरलीधर साळुंके असे हत्या झालेल्या जावयाचे नाव असून मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, अमितचे त्याची बाल मैत्रीण असलेली विद्या हीच्या सोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांची जात आणि धर्म वेगळा होता. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती विद्याच्या घरी समजली असता त्यांनी दोघांच्याशी नात्याला व लग्नाला विरोध केला. मात्र, दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून देऊन एप्रिल महिन्यात त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. विद्या ही बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. दरम्यान, अमितच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली.
अमितच्या हत्येचा कट रचण्यात आला –
मे महिन्यात अमित व विद्या त्यांच्या घरी परतल्यावर त्यांचा संसार सुखाचा चालला होता. दरम्यान, अमितच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला स्वीकारले असले तरी विद्याच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. म्हणून विद्याचे वडील आणि चुलत भावाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यानंतर अमितच्या हत्येचा कट रचण्यात आला.
अमितवर चाकून हल्ला –
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने विद्याच्या वडिलांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी व विद्याचा चुलत भाऊ याच्याशी मिळून 14 जुलै रोजी अमितवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करून त्याला भोसकले होते. यात अमित गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज –
अमित हा तब्बल 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, शुक्रवारी घाटी रुग्णालयात अमितची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी वडील आणि भावाचा शोध घेत आहेत. मात्र, दोघेही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती