सोलापूर, 19 जून : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं काल 18 जून रोजी सायकांळी निधन झालं. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील ,सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान, निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली यांना आपण मुकलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन –
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. दरम्यान, त्यांनी दिलेल्या योगदानामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि ते आजारी आणि अंथरुणातचं होते. दरम्यान, काल संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
आज अंत्यसंस्कार –
एक वन अधिकारी व वन्य पशुपक्षी अभ्यासक असल्यामुळे अरण्यऋषी मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांनी नवेगावबांध या राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच आपल्या पदाला कर्तव्य म्हणून त्यांनी न्याय दिला. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज 19 जून रोजी त्यांची अंत्ययात्रा दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
कोण आहेत मारुती चित्तमपल्ली?
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली होती. त्या काळात त्यांनी देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 5 लाख किमी प्रवास केला होता. मारुती चितमपल्ली यांना तब्बल 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांसाठी माहिती मिळवली.
त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या असून या डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन त्यांनी पूर्ण केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके मारूती चितमपल्ली यांनी लिहिली.