मुंबई. 13 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या राजकाराणातून आताच्या क्षणाची सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
अशोक चव्हाण भाजपात –
अशोक चव्हाण यांनी काल आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आज अशोक चव्हाण हे भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले अशोक चव्हाण? –
पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आम्ही विरोधात तसेच सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली आहे. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करतोय. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करत आहे.
काँग्रेसला मराठवाड्यात खिंडार –
अशोक चव्हाण यांनी काल राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. पुढील 1 ते 2 दिवसांत राजकीय भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, त्यांनी आज भाजपात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.
आमदार पदाचा राजीनामा –
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काल सकाळपासूनच नॉट रिचिबल येत होते. दरम्यान, त्यांनी काल ट्विट करत आमदार पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते.
हेही वाचा : Ashok Chavan Resigns : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम