चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
धुळे/मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते हे महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काही जण हे शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. तर काही जण हे भारतीय जनता पक्षात जात आहेत. यातच आता खान्देशातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
खान्देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. कुणाल पाटील यांचा हा पक्षप्रवेश सोहळा उद्या 1 जुलै रोजी दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात होणार आहे. कुणाल पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला खान्देशात मोठा धक्का बसणार आहे.
कोण आहेत कुणाल पाटील –
कुणाल पाटील यांच्या कुटुंबांचे मागील तब्बल 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ नातं राहिले आहे. कुणाल पाटील यांचे वडील माजी मंत्री रोहिदास पाटील हे मागील अनेक दशके काँग्रेसमध्ये होती. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले.
रोहिदास पाटील यांना खान्देशच्या राजकारणातील भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचे आणि राजीव गांधी यांचे घनिष्ठ संबंध होतं. खान्देशात त्यांनी पक्षाचं मोठं काम उभे केले होते. त्यामुळे मागच्या वर्षी 2024 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, आता माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र कुणाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर आता यावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या दुपारी 2 वाजता कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता कुणाल पाटील यांचा हा भाजप प्रवेश काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा फटका मानला जात आहे.