ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 16 ऑक्टोबर : शिवसेना उबाठा गटाकडून वैशालीताई उमेदवारी मागताय. दीड वर्षांपुर्वी 50 खोक्यावाल्यांनी शिवसेना पक्ष सोडला. तेव्हा उबाठाच्या ह्या वैशालीताई तयार झाल्या. वर्ष-दीड वर्षांत त्यांचा किती संपर्क झाला..किती आंदोलन यांनी केली. थोडेफार दोन-पाच आंदोलन त्यांनी केली असतील. यांना मतदारसंघातील काही गावे माहित नाही… काही गल्ल्या माहित नाही. कार्यकर्त्यांचे घर माहित नाही, असे म्हणत झेडपीत कोणता गण येतो आणि कोणतं गाव कोणत्या गटात येतं, याचा अभ्यास नसलेले लोकंसुद्धा उमेदवारी मागत आहेत, असा निशाणा माजी आमदार दिलीप वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यावर साधला. परंतु, लोकशाही असल्याने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचे दिलीप वाघ म्हणाले. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
दिलीप वाघ काय म्हणाले? –
दिलीप वाघ म्हणाले की, माझा जन्मही झाला नव्हता त्यावेळी माझे वडील आमदार झाले होते. तेव्हापासून वाघ परिवाराने मतदारसंघातील जनतेसोबत संपर्क ठेवलाय. कुणाचे सुख दुख असेल त्यामध्ये कायम सहभागी असतो. मी मतदारसंघात गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते मला ओळखतात. म्हणून मला काही नवीन कार्यकर्ते जोडण्याची गरज नाहीये. जे आहेत त्यांचेच वारसदार म्हणजेच आप्पासाहेब (कै. ओंकार वाघ) यांच्यासोबत ज्यांनी काम केले त्यांचे नातु आज वाघ परिवाराचे काम करत आहेत. दरम्यान, पक्ष वैगरे बाजूला राहिला. मात्र, वैयक्तिक पातळीवर मला मानणारा वर्ग या पाचोरा-भडगाव मतदारसंघात आहे. आणि याच हिंमतीच्या बळावर मी तुमच्यासमोर येणार आहे, असेही दिलीप वाघ म्हणाले.
पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणूक लढवू –
खोक्यांचे राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेले नाही. हे लोकसभेत सिद्ध झालेले आहे. आणि म्हणून ह्या खोकेवाल्यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. इतरत्र उमेदवारही असतील हे आज अस्पष्ठ असलं तरी येणाऱ्या कालाखंडात लोकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. आणि खंबीरपणे आपण राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. मिळाली तर ठीक अन्यथा नाही मिळाली तर अतिउत्तम, आपण तुमच्या विश्वासावर निवडणूक लढवू आणि 2024 मध्ये बदल घडवू आणि निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका –
तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघात घाणेरड्या पद्धतीने राजकारण केले जात असून मतदारसंघात गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप दिलीप वाघ यांनी केलाय. तसेच त्यांच्याकडे शिवसेना नसून आता फक्त काँन्ट्रॅक्टर सेना राहिलेली आहे, असे म्हणत त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय.