गजानन न्हावी, प्रतिनिधी
बोदवड, 30 जानेवारी : बोडवड तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांचा मुक्त वावर मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. कमी झालेले वन क्षेत्र व कधी कधी संरक्षित असलेल्या वन क्षेत्रातुन भरकटल्यामुळे हे प्राणी शिवारात येत असतात.
रानडुकरे व रोही यासारख्या जंगली प्राण्यांकडून शेतपीकांचे नुकसाने होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी खुप चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिक म्हणून हरबरा,गहू व मका पेरणी केली असून रात्री हे प्राणी या पिकाची नासधूस करत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी –
यासंदर्भात राजूरचे शेतकरी जिवराम न्हावी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी रोज पूर्ण रात्रभर शेतात जागी राहून प्राणावर लक्ष ठेऊन असतो आणि सकाळी शेतात पुन्हा काम करावे लागते. यामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दरम्यान, जंगली प्राण्यांचा मुक्त वावर मोठया प्रमाणात वाढल्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा : छगन भुजबळ यांचा गैरसमज दूर होईल, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?