पारोळा, 14 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. बैलगाडीला गॅस कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघात बैलाचा मृत्यू झाला आहे. तर बैलगाडी चालक जखमी झाला आहे. अपघाताची ही घटना पारोळा-राष्ट्रीय महामार्ग सहावरील सावखेडा होळ गावाजवळ घडली.
काय आहे संपूर्ण बातमी –
मिळालेल्या माहितीनुसार, धरमसिंग महासिंह पाटील हे पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील रहिवासी आहेत. गुरुवारी 12 जानेवारीला संध्याकाळी ते शेतातून आपली बैलगाडी घेऊन महामार्गाच्या साईटपट्टीने येत होते. मात्र, यावेळी जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव येणारा गॅस कंटेनर (क्र. एमएच 04 एचवाय 3408) याने श्रीनिका पेट्रोलपंप समोर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बैलगाडीला जोरदार धडक दिली. गॅस कंटेनरने दिलेल्या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडी चालक धरमसिंग हे जखमी झाले.
हेही वाचा – पारोळ्यातील धक्कादायक घटना, चोरट्यांनी घर फोडून केले हजारोंचे दागिने लंपास
दरम्यान, या अपघाताप्रकरणी धरमसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालक सुकहु संभाल यादव (बळीरामपूर, ता. केराकत, जोनपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शंकर नगर माहू रोड चेंबूर मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करीत आहेत.