चाळीसगाव, 9 फेब्रुवारी : राज्यभरात तरूणाईला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटील आज जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच येत आहे. चाळीसगावात आज संध्याकाळी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
चाळीसगावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम –
चाळीसगावात सिटीक्लिक मीडिया प्रा. लि. चाळीसगाव तर्फे 9 फेब्रुवारी रोजी मालेगाव रोड बायपास पाँईन्ट जवळ सायंकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासह गायिका मेघा मुसळे, गायक भैय्या मोरे, कवीवर्य सोमेश्वर कासार, हास्यकवी रमेश पोतदार, गायिका निर्मला पवार, बासरी वादक प्रकाश चौधरी, डायरेक्टर संजय सोनवणे आणि विजय पाटील असे अनेक खान्देशी कलाकार उपस्थित राहणार आहेत.
डान्सर गौतमी पाटील ही पहिल्यांदाच जळगाव जिल्हा तसेच चाळीसगाव तालुक्यात येत आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळते. यापूर्वी अनेकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दृश्य समोर आले होते.
कोण आहे गौतमी पाटील?-
गौतमी पाटीलने मागील काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील एक पत्रकार परिषदेत तिच्या स्वतःविषयी माहिती दिली होती. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावात गौतमी पाटील हिचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिले. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथेच लहानाची मोठी झाली. गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचे कुटुंब पुण्यात आले. दरम्यान आई छोटी-मोठी कामे करून घर चालवायची.
गौतमी पाटील सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रात काम करून गुजराण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. लावणीच्या क्षेत्रात पूर्वी आपल्या संपर्कातील कुणीच नव्हते. सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर तिला पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली. गौतमी पाटीलचे सध्या इन्स्टाग्रामवर 3 लाख 40 हजारांवर फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू