ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 नोव्हेंबर : धुळे येथे 8 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत पाचोरा येथील न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या क्रिकेट संघाचा दणदणीत विजय झाला. यासाठी विभागातून आठ संघ उपस्थित होते. नाशिक संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून मुलींच्या या संघाने आपला विजय नोंदवला. दरम्यान, या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय सामन्यांसाठी निवड झाली आहे.
धुळे येथे झालेल्या आंतरशालेय विभागी स्तरावर 17 वर्षाआतील क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पाचोरा संघाने नाशिक येथील मनपा शाळेचा पराभव करत विजतेपद मिळवले. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले होते. तत्पूर्वी, सेमीफायनल सामन्यात पाचोरा संघाने शिरपूर संघाला नमावत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात नाशिक संघाने 8 षटकांत 51 धावा केल्या. पाचोरा संघाने या धावांचा पाठलाग करत असताना 8 चेंडू शिल्लक विजय प्राप्त केला. त्यात पाचोरा संघाकडून कर्णधार सायली पाटीलने उत्तम फलंदाजी करत 20 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पाचोरा संघाने उत्तम क्षेत्ररक्षणाच्या बळावर हा विजय मिळवला.
या विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक अभिषेक विलास भावसार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ,सेक्रेटरी, शाळेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, प्राचार्य, उपप्राचार्य ,सुपरवायझर, शिक्षक वृंद यांनी विजयी संघाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.