इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे तसेच खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच आता जळगाव जिल्ह्यात किती आणि कुणाला मंत्रीपद मिळणार, याबाबतही सर्वांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विजयाची हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करावे, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
पत्रात काय –
आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या आणि जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करू शकणाऱ्या, दांडगा संपर्क आणि संघटन चातुर्य असणाऱ्या किशोर आप्पा पाटील यांना आपण राज्यमंत्रीपद द्यावे. यामुळे जिल्ह्यत पक्ष संघटन बळकट होण्यास मदत होईल, अशा आशयाचे पत्र युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
किशोर आप्पा पाटील यांची हॅटट्रिक –
पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देऊन समाजकार्यात प्रवेश केलेल्या किशोर आप्पा पाटील यांनी आता तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकत मतदारसंघात एक इतिहास आपल्या नावावर केलेला आहे. आतापर्यंत पाचोरा भडगाव मतदारसंघ सलग तीन वेळा आमदार होण्याचे भाग्य कुणालाही लाभले नाही. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळते का, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे झालेल्या सभेत किशोर आप्पा यांचा मानसपूत्र म्हणून उल्लेख केला होता. तसेच हा मतदारसंघ मी दत्तक घेत असल्याची घोषणाही केली होती. इतकेच नव्हे तर विजयची हॅटट्रिक केल्यावर एकनाथ शिंदे साहेब हे मंत्रिपदासाठी माझा 100 टक्के विचार करतील, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले होते.
‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’सोबत बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील नेमकं काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्यांदा ऐतिहासिक असा विजय मिळवल्यावर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला होता. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले होते की, ‘माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. मागच्या वेळी माझी दुसरी टर्म होती. त्यामुळे मी मंत्रिपदासाठी आग्रह धरला नव्हता. कारण संख्या जास्त आणि अपेक्षा खूप लोकांच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) किंवा आमच्या नेत्यांना तो त्रास देणं, हे मला स्वत:ला उचित वाटत नव्हतं. मात्र, मी आता त्या गोष्टीसाठी पात्र आहे. मी तिसरी टर्म आता जिंकलेलो आहे आणि माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेने जो मला हा कौल दिला, त्यामध्ये विकासाबरोबर हासुद्धा एक वाटा आहे की, जर उद्या किशोर आप्पा निवडून आले, तर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात स्व. के. एम. बापू पाटील साहेबांनंतर दुसऱ्यांदा फक्त किशोरआप्पांना मंत्रीपद मिळणार आहे, जर आमदार असताना इतका विकास करू शकतो, तर मंत्री झाल्यावर विकासात्मक दृष्ट्या एका वेगळ्या प्रगतीच्या दिशेने हा मतदारसंघ जाताना दिसेल, अशी आशा आणि अपेक्षा माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेची बाळगते आहे. मला निश्चितपणे खात्री आहे, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे माझा 100 टक्के विचार करतील, अशी मला खात्री आहे आणि माझ्या जनतेने माझ्याबद्दल जो विश्वास बाळगलेला आहे, तो त्यांनी पूर्ण करावा अशी मला अपेक्षा आहे’, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले होते. दरम्यान, महायुतीच्या सरकारमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळते का, याकडे सर्व मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा – oath ceremony maharashtra : थेट महाशपथविधी सोहळ्यातून ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा विशेष आढावा..