जळगाव, 13 एप्रिल : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा सत्कार काल नियोजन भवन, जळगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण करत फटाकेबाजी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
गुलाबराव पाटील म्हणाले की, पुरेशा पटसंख्येअभावी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. असे असताना शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो, तसेच तुम्ही देखील दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी फोडा आणि शाळा चालवा. दरम्यान, जळगाव ग्रामीणमधील पटसंख्या वाढविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना 10 लाखांचा आमदार निधी देईन अशी घोषणाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली.
View this post on Instagram
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही, तर त्या गुणवत्तापूर्णही असाव्यात. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पटसंख्या वाढवून गुणवत्ता उन्नतीचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार रोहित पवार यांची टीका –
शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी फोडण्याचा अजब सल्ला पालकमंत्र्यांनी जळगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना दिल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी जोरदार टीका केलीय. आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री गुलाबराव पाटील सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि आयकर विभागाच्या (आयटी) चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारावी. असं केल्यास शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे देखील आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.