जळगाव, 14 एप्रिल : जिल्हा परिषदेतील शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी फोडा असे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गंमतीने एका कार्यक्रमात म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आता गुलाबराव पाटील यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आले असता त्यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार रोहित पवार यांच्या टीकेबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘ते इंग्लिश मीडियमध्ये शिकलेलं पोट्टं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलाय. त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते. पुर्ण भाषण ऐकलं नाही. अपुर्ण बुद्धीचा माणूस आहे. त्यामुळे त्याने तपासून घ्यावं,’ असा हल्ला यावेळी गुलाबराव पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर चढवला.
रोहित पवार काय म्हणाले होते? –
गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत टीका केली होती. ते यामध्ये म्हणाले की, आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय ईडी, सीबीआय, आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय. दरम्यान, मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे एक्स पोस्टच्या माध्यमातून रोहित पवारांनी गुलाबराव पाटील यांना डिवचलं होतं.
गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य काय होतं?-
पुरेशा पटसंख्येअभावी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. असे असताना शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो. तसेच तुम्ही देखील दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी फोडा आणि शाळा चालवा, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. दरम्यान, जळगाव ग्रामीणमधील पटसंख्या वाढविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना 10 लाखांचा आमदार निधी देईन अशी घोषणाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली होती.
हेही वाचा : राज्यात पुन्हा अवकाळी आणि गाटपीटची शक्यता, पुढील दोन दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज नेमका काय?