जळगाव, 25 सप्टेंबर : हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता. असे असताना पाचोरा, भडगावसह जळगाव शहरात तसेच जिल्ह्यातील विविध भागात मंगळवार रोजी संध्याकाळपासून विजांचा गडगडाट अन् वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. तर आज सकाळी पारोळा, भडगावसह पाचोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. चाळीसगाव तालुक्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. याचबरोबर रावेर व यावल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यावल तालुक्यात काही गावांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तत्पुर्वी, सोमवारी देखील जळगावात सायंकाळी दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला होता.
राज्यात पुढील 4 दिवस पाऊस कायम –
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पुढील 4 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आजही राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview