ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 जुलै: महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून पाचोरा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षाचे’ उद्घाटन नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी हिरकणी कक्षाच्या उद्देशाबाबत माहिती देताना सांगितले की, तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी किंवा खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या स्तनदा माता व लहान बालकांसह येणाऱ्या महिलांना सुरक्षित, स्वच्छ व गोपनीय वातावरणात स्तनपान करता यावे, यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, महसूल नायब तहसीलदार प्रमोद मोरे, संजय गांधी नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत, पुरवठा नायब तहसीलदार सुषमा उरकडे, महिला ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी, नगरसेवक तसेच तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
हेही वाचा: VIDEO | जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक






